पोलीस आता तक्रारदारांनी नावे ट्रॅकेंट(गुप्त) ठेवणार
नांदेड(प्रतिनिधी)-अतिरेकी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याच्यासोबत असणारी मैत्री एका युवकाला आता महागात पडली असून त्याला मकोका अंतर्गत अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी 14 दिवस, अर्थात 19 जुलै 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधूने एका टी.व्ही.मुलाखतीत मी आजपर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खंडणी वसुल केली असल्याचे कबुल करून ते पैसे मी कसे वापरणार आहे याचे विस्तृतविवरण केले होते. त्यानंतर काही जणांनी रिंदाचे नाव वापरून स्वत:च खंडणी वसुलीचा नवीन धंदा सुरू केला. त्यात मागील महिन्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.खोटे नाव वापरल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात चार जण सध्या लोहा न्यायालयाच्या आदेशाने तुरूंगात आहेत. त्यांनाच पुढे वजिराबादच्या गुन्ह्यात हस्तांतरणावर आणून कार्यवाही होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून नांदेडमधील गडगंज श्रीमंतांनी रिंदाला लाखो रुपयांच्या खंडण्या दिल्या. रिंदाच्या नावावर अनेकांकडे सुरक्षा रक्षक देण्यात आले. त्यातील काही जणांना तर सुरक्षा रक्षक ए.के.47 हीच बंदुक घेवून हवा आहे. त्यांची माहिती कशी घेतली, त्यांना का सुरक्षा रक्षक दिले. ज्यांना सुरक्षा रक्षक दिले त्यातील प्रत्येक जण त्याच लायकीचा आहे काय? याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पोलीस विभागाला आहे.
काही जणांनी रिंदाला खंडण्या तर दिल्या पण पोलीसांत तक्रार देण्याची त्यांची हिंमत झाली नाही. हळूहळू ही बाब पोलीस अधिक्षकांपर्यंत पोहचल्यानंतर याप्रकरणी गुपचूप तपासणी झाली. या प्रकरणाची चौकशी अशा पोलीस निरिक्षकाला देण्यात आली ज्यांच्याकडे कर्तव्याच्या मधोमध कोणत्याही नात्यांची किंमत नसते. ही चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्या दबंग पोलीस निरिक्षकाने पोलीस ठाणे वजिराबाद येथे तक्रार दिली की, नांदेड शहरातील अनेक जणांकडून हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू हा खंडण्या वसुल करीत आहे. पण खंडण्या देणारे व्यक्ती पोलीसांकडे तक्रार देण्यास तयार नाहीत. म्हणून त्यांनी काही जणांची नावे घेत दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 119/2023 दाखल केला. हा गुन्हा दाखल होवून जवळपास 40 दिवस झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास मकोका कायद्यामुळे शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार कोण्या तरी एका व्यक्तीला 1 कोटी रुपयांची खंडणी हरविंदरसिंघ उर्फ रिंदाने मागितली. त्या व्यक्तीचा नातलग भरतकुमार धरमदास पोपटाणी (40) हा रिंदाच्या लहानपणचा मित्र आहे. म्हणून हा प्रकार भरतकुमारकडे आला. भरतकुमारने त्या प्रकरणात एक कोटीच्या खंडणीला 40 लाखापर्यंत खाली आणले आणि हा खंडणीचा व्यवहार पुर्ण झाला. अत्यंत कासवगतीने पोलीस या प्रकरणाला हाताळत होती. कारण यात युएपीए अर्थात देशद्रोहासाठीचा कायदा जोडण्यात आला आहे. वसुल करण्यात आलेली खंडणी ही टेरर फंडींग असल्याने या प्रकरणाची हाताळणी अत्यंत गुप्त असणे आवश्यक होते. त्याच पध्दतीने पोलीसांनी या प्रकरणाची हाताळणी केली. दि.5 जुलै रोजी भरतकुमार पोपटाणीला अटक झाली. पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आणि त्यांच्या सहकारी अधिकारी आणि अंमलदारांनी काल दि.6 जुलै रोजी भरतकुमार धरमदास पोपटाणीला न्यायालयात हजर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी भरत पोपटाणीला 14 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या संदर्भाने आता पोलीसांनी खंडणी देणाऱ्यांची नावे ट्रॅंकेट करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. एकाला अटक झाली आहे तो सध्या पोलीस अभिरक्षेत आहे. त्यामुळे ज्या लोकांनी अशा खंडण्या दिल्या असतील आणि तक्रार केली नसेल अशांनी आता तरी तक्रारी देण्याची गरज आहे. कारण खंडणी टेरर फंडींगसाठी वापरली जाणार असेल तर तो धोका आपल्याला नसून आपल्या देशाला सुध्दा आहे.या प्रकरणातील इतर गुन्हेगारांना शोध सुरू आहे. पोलीस विभाग त्यांनाही लवकरच गजाआड करेल.
