नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे पोलीस विभागात काम करतांना अत्यंत कमी सुविधांमध्ये सुध्दा नांदेड रेल्वे पोलीसांनी तक्रार आल्यानंतर 48 तासात चोरीला गेलेली संपत्ती जवळपास पुर्ण जप्त केली. यासाठी रेल्वे नांदेड पोलीसांचे रेल्वे पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे आणि रेल्वे पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कौतुक केले आहे.
जालनामध्ये घर असणारी एक महिला दि.12 जुलै 2023 रोजी नांदेडला आली होती. कारण त्यांच्या वडीलोपार्जित घराची विक्री होणार होती. एकूण 12 वारसदार होते. त्यातून प्रत्येकाच्या वाट्याला 7 लाख 50 हजार रुपये आले. आपले पैसे घेवून ही महिला 14 जुलै 2023 रोजी नांदेड ते जालना असा प्रवास करत असतांना रेल्वेच्या बोगीमधून त्यांची बॅग चोरीला गेली ज्यामध्ये 7 लाख 50 हजार रुपये होते. ती महिला 14 जुलैच्या तपोवन एक्सप्रेस गाडीच्या कोच क्रमांक सी-1 मध्ये 34 क्रमांकाच्या सीटवरून प्रवास करत होती. ती महिला नांदेडवरून गाडीत बसल्यानंतर तीला लगेच झोप लागली. त्यामुळे ती जालना येथे न उतरता झोपेमध्ये औरंगाबादपर्यंत पुढे गेली. तिच्या फोनवर वारंवार फोन येत होता. म्हणून तो फोन टी.सी.ने उचलला आणि त्यानंतर त्या महिला औरंगाबाद येथे उतरल्या. त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मामा सासरे यांची तबेत बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी मामा सासऱ्याकडे असलेली 7 लाख 50 हजार रुपयांची बॅग नाही ही माहिती प्राप्त झाली. त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर 17 जुलै 2023 रोजी आपली बॅग ज्यामध्ये 7 लाख 50 हजार रुपये होते. गायब झाल्याची तक्रार नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्या तक्रारीचा क्रमांक 765/2023 असा आहे.
नांदेड रेल्वे पोलीस स्थानकातील पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे, सहाय्यक पोलीस निरिक्षक अनुपमा केंद्रे, पोलीस अंमलदार जीवराज लव्हारे आणि निखील गजभे यांनी आलेल्या तक्रारीनुसार काहीच माहिती उपलब्ध नसतांना आपण पोलीस दलात शिकलेल्या कसबांचे कसब लावून नांदेड येथील प्रविण शिंगरे (24) या युवकास अटक केली. हा युवक प्रविण शिंगरे हा त्या 12 वारसदारांच्या ओळखीचा आहे. तो त्या महिलेला आणि मामा सासऱ्यांना सोडायला रेल्वे स्थानक नांदेड येथे आलेला होता. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, हा प्रविण शिंगरे त्यांना गाडीमध्ये बसवून परत घरी गेला नाही तर तो रेल्वे गाडीच्या दुसऱ्या डब्यात बसला आणि पुर्णाजवळ या लोकांना झोप लागल्याची संधी साधून ती बॅग घेवून पुर्णा मध्येच उतरला. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर 48 तासाच्या आत रेल्वे पोलीसांनी प्रविण शिंगरेला अटक केली होती. त्याच्याकडून 3 लाख 89 हजार 500 रुपये रोख रक्कम, दुसरे 91 हजार 497 रुपये रोख रक्कम, चोरी करून प्रविण शिंगरेने खरेदी केलेले 44 हजार 561रुपयांचे सोने, तसेच आयसीआयसीआय बॅंकेत जमा केलेली 2 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चोरीला गेलेल्या 7 लाख 50 हजार पैकी 7 लाख 35 हजार 558 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रेल्वे विभागात पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना हव्या त्या सुविधा उपलब्ध नसतात. पोलीस ठाण्यांची हद्द दुर-दुरपर्यंत असते. या परिस्थितीत सुध्दा नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांच्या सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक अनुपमा केंद्रे, पोलीस अंमलदार जिवराज लव्हारे आणि निखील गजभे यांनी पोलीस दलात गुन्हा घडल्यानंतर लागणारे पुर्णप्रकारचे कसब वापरून 48 तासाच्या आत चोरी करणारा आरोपी पकडला आणि जवळपास चोरीचा संपुर्ण मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला. रेल्वे पोलीसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक रेल्वेच्या पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे आणि पोालीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कौतुक केले आहे.