
नांदेड(प्रतिनिधी)-जगात महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या गप्पाच मारल्या जातात.या विषयावर गांभीर्याने विचार होत नाही ही या भारतातील दुर्देवी बाब आहे. भारतीय संस्कृतीने, “या देवी सर्व भुतेशु पुत्री रुपेण संस्कृत: नम:तस्यये नम:तस्यये नमो नम:’ ही शिकवण दिली आहे. पण याचा विसर आपल्याला पडलेला आहे. हे सर्व लिहिण्यामागे कारण बालिकेबद्दल आहे. ही बालिका रेल्वे डब्यात सोडून आई-वडीलांनी पळ काढलेला आहे.का केले असेल त्यांनी असे किंवा कोणी तरी मुलीला पळवले आणि नंतर भितीने तिला रेल्वे गाडीत सोडून तिचे किडनॅपर स्वत: पळून गेले. काय घटनाक्रम आहे देवच जाणे परंतू या बालिकेला आज आपले छत्र हरवले आहे हे कळण्याइतपत ती मोठीपण नाही. रेल्वे विभागातील पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारी बालिकेबद्दल कोणास काही माहिती असेल तर त्याबद्दल त्यांनी रेल्वे पोलीस विभागाला कळवावे.
घडलेला घटनाक्रम असा आहे की, 3 डिसेंबर रोजी रेल्वेमध्ये प्रवास करणारी महिला गरजाबाई गोविंद गायकवाड (60) रा.हज्जापूर ता.मुदखेड ही महिला रेल्वे गाडीत बसून उमरी ते मुदखेड प्रवास करतांना तिच्या जवळ एक आठ वर्षाची बालिका आली आणि तिने त्या महिलेला पेरु मागितला. महिलेने तिला पेरू दिला आणि ती आपल्या गंत्वव्य स्थळावर उतरली. आपल्या गावी हज्जापूर येथे ती महिला 4 किलो मिटर पायी चालून गेली. ही पेरू घेणारी बालिका तिच्या मागे-मागे गावात पोहचली. रात्रभर गिरजाबाई या माईने तिचा सांभाळ केला. सकाळी 4 डिसेंबर रोजी ती महिला बालिकेला घेवून पोलीस ठाणे मुदखेड येथे गेली. पोलीसांच्या कामकाजामध्ये अनेक तांत्रिक बाबी असतात आणि या तांत्रिकबाबींमुळे मुदखेड पेालीसांनी ही बालिका नांदेड रेल्वे पोलीस विभागाकडे पाठवून दिली.
कायद्याच्या अनेक चर्चा घडल्या आणि मुदखेड येथील महिला पोलीस अंमलदार माधुरी अजय यावलीकर यांच्या तक्रारीवरुन कोणी तरी आई-वडीलांनी आपली जबाबदारी असलेली ही अल्पवयीन बालिका आपल्या अभिरक्षेतून सोडून दिल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 317 नुसार गुन्हा क्रमांक 1180/2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास रेल्वेच्या महिला पोलीस अंमलदार विजया मेलफेदेवार यांच्याकडे देण्यात आला आहे. ही बालिका आपले नाव भाग्यश्री असल्याचे सांगते. पण यापेक्षा जास्त तिला काही सांगता येत नाही. आपल्या अभिरक्षेतील 12 वर्षापर्यंतच्या बालकाला त्याच्या पालकांनी अशा प्रकारे अधांतरीत सोडून दिले तर भारतीय दंड संहितेप्रमाणे सात वर्ष सक्तमजुरीसह रोख दंडाची शिक्षा कायद्यात प्रस्तावीत केलेली आहे.
आजच्या परिस्थितीत नांदेड रेल्वे पोलीस या बालिकेचे अभिरक्षक आहेत. ते किती दिवस या बालिकेची अभिरक्षा करतील याला मर्यादा आहेत. कोण्या आई-वडीलांची मुलगी कोणी किडनॅपरने पळवली असेल तर त्याचा गुन्हाही दाखल असेल. परंतू आई-वडीलांनी स्वत:च ही बालिका भविष्यातील ओझ्यांचा विचार करून स्वत: रेल्वे गाडीमध्ये सोडून निघून गेले असतील तर त्या आई-वडीलांनी या बालिकेला जन्मच का दिला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.व्यासपीठावरून महिला सुरक्षा, महिलांचे सामर्थ्य, त्यांचे सक्षमीकरण यावर भरपूर गप्पा मारल्या जातात. परंतू प्रत्यक्षात त्यावर प्रभावी काम कोणी करत नाही आणि यामुळेच महिलांवर होणारा अन्याय हा सतत कायमच असतो.
वास्तव न्युज लाईव्हने या निरागस अल्पवयीन बालिकेप्रती आपली जबाबदारी समजून आम्ही याबातमीला प्रसिध्दी दिली आहे. रेल्वे विभागाचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, जनतेतील कोणत्या व्यक्तीला या बाबलिकेचा फोटो पाहुन बालिकेबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती रेल्वे पोलीस ठाणे नांदेड रेल्वे स्थानक नांदेड येथे कळवावी तसेच रेल्वे विभागाचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांचा मोबाईल क्रमांक 9823230503 यावर माहिती दिली तरी ती माहिती या बालिकेच्या पालकांना शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल. सुरेश उनवणे यांनी त्यांना माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही सांगितले आहे.
