नांदेड(प्रतिनिधी)-आज सर्वत्र शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जगाला शिकवून ज्ञान प्रसारीत करणाऱ्या शिक्षकांकडून हजारोंच्या संख्येत अवैध मतदान झाले आहे. किती हे मोठे दुर्देव कि जगाला शिक्षण देणाऱ्या शिक्षकांकडून मतदान करतांना मते अवैध ठरणे म्हणजे पिढ्या बरबाद करणारे असेच म्हणावे लागेल.
भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षक हा अत्यंत आदराच्या जागी पाहिला जातो. कारण अत्यंत दगड असलेले बालक त्यांच्याकडे पाठविले जातात. त्यांना एखाद्या शिल्पकाराप्रमाणे घडवून त्याची एक सुंदर मुर्ती तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणूनच त्या बालकांचे भविष्य घडते. बालक आपल्या आई-वडीलांना भिणार नाही पण शिक्षकाचे नाव घेतल्यानंतर त्याच्या अंगावर शहारे येतात. यावरून शिक्षकांमधील असणारा दम कळतो.
आज राज्यभर शिक्षक मतदार संघातील निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. त्यामध्ये शिक्षक मतदार संघ क्रमांक 5 औरंगाबाद विभाग या मतदार संघात मतदानाची एकूण संख्या 50 हजार 771 आहे. त्यात 2485 मतदान अवैध ठरले आहे. कोकण विभागातील शिक्षक मतदार संघात 34 हजार 69 मतदान झाले आहे. त्यात अवैध मतांची संख्या 1619 आहे. इतर मतदार संघांच्या उमेदवारी आघाडीबद्दल माहिती येत आहे. परंतू त्यातील एकूण मतदान आणि त्या एकूण मतदानात अवैध मतदान याची सविस्तर माहिती प्राप्त होत नाही.
दोन शिक्षक मतदान संघातील अवैध मतदानांची संख्या पाहिली असता जवळपास 84 हजार मतदानांमध्ये 4877 एवढे मतदान अवैध ठरले आहे. म्हणजे जवळपास 3 टक्के मतदान अवैध झाले आहे. ज्या शिक्षकांना या देशाचे भविष्य घडवायचे आहे त्यांनी केलेल्या मतदानात मतदान अवैध ठरत असेल तर आजपर्यंत या शिक्षकांनी किती पिढ्या बरबाद केल्या हा प्रश्न उपस्थित केला तर चुक ठरणार नाही.
शिक्षक मतदार संघात हजारो मतदान अवैध; अवैध मतदान करणाऱ्या शिक्षकांनी किती पिढ्या बरबाद केल्या ?