1 लाख 80 हजारांचे धनादेश प्रकरण ; आरोपीची मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)-आरोपीचा धनादेश तुमच्याकडे कसा आला याचे समिक्षण केल्यानंतर परक्राम्य संकीर्ण अभिलेख (एन.आय.अँक्ट) कायद्याप्रमाणे या प्रकरणातील 1 लाख 80 हजारांचा धनादेश न वठल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी आरोपीची मुक्तता केली आहे.

नांदेड न्यायालयात एस.एस.सी.क्रमांक 1069/2017 हा खटला सुरू होता. या खटल्यातील पार्श्र्वभूमी अशी आहे की, नांदेड महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले बाबूराव भोजराव गुडमलवार यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर आलेल्या निधीतून शैलेश दत्तात्रय देशपांडे रा.औरंगाबाद यांना 1 लाख 80 हजार रुपये धनादेशाद्वारे दिले. त्यावेळी शैलेश देशपांडे यांना पैशांची अत्यंत गरज होती. पुढे विहित मुदतीत पैसे परत दिले नाहीत.तेव्हा शैलेश देशपांडेने 1 लाख 80 हजारांचा धनादेश गुडमलवार यांना दिला.पण तो सुध्दा वठला नाही म्हणून त्याबाबतची नोटीस 5 एप्रिल 2017 रोजी बाबुराव गुडमलवार यांच्यावतीने ऍड.एस.एल.बोटलवार यांच्यामार्फतीने शैलेश देशपांडे यांना नोटीस पाठविण्यात आली. ही नोटीस खाजगी कुरीअरने पाठवली होती. ही नोटीस शैलेशचे वडील दत्तात्रय यांनी स्वाक्षरी करून घेतली. त्यानंतर सुध्दा पैशांचा व्यवहार कायम राहिला. म्हणून खटला क्रमांक 1069/2017 दाखल करण्यात आला. या खटल्यात बाबूराव गुडमलवार आणि त्यांच्या पत्नीने साक्ष दिली. आरोपी शैलेश देशपांडेच्यावतीने बचाव करतांना ऍड.गिरीश मोरे यांनी सादरीकरण केले की, नोटीसवर आरोपी शैलेश देशपांडेची स्वाक्षरी नाही. बाबूराव गुडमलवार सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे खाते पत्रक न्यायालयात सादर केले नाही. तसेच आरोपी शैलेश गुडमलवारने दिलेला जो धनादेश वठला गेला नाही तो धनादेश बाबूराव गुडमलवारकडे कसा आला. याबद्दल सादरीकरण करतांना ऍड.गिरीश मोरे यांनी सांगितले की, शैलेश देशपांडे आणि बाबूराव गुडमलवार यांच्या पत्नी एकाच कार्यालयात काम करतात आणि तेथून धनादेश गायब करून शैलेश देशपांडे विरुध्द खोटा खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायालयासमक्ष आलेल्या एकूण पुराव्यानुसार न्यायालयाने शैलेश देशपांडे यांची 1 लाख 80 हजार रुपयांच्या धनादेश न वठलेल्या खटल्यातून मुक्तता केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *