11 महिने कर्तव्यावर गैरहजर राहिलेले पोलीस निरिक्षक सुनिल नागरगोजे निलंबित

पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांचे आदेश 

नांदेड(प्रतिनिधी)-सतत 11 महिने आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर न येता आजारी रजेवर राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील एका पोलीस निरिक्षकाला नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश तात्काळ त्यांना तामील करून घेण्याची जबाबदारी लातूरचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी लातूरच्या पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांना दिली आहे.

सन 2021-22 च्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी लातूर जिल्ह्यात पोलीस कल्याण विभागात कार्यरत पोलीस निरिक्षक सुनिल रामराव नागरगोजे यांना लातूर जिल्ह्यातून बदलून परभणी जिल्ह्यात दि.19 ऑगस्ट 2021 रोजी बदली केली होती. परंतू सुनिल नागरगोजे यांनी 31 जुलैपासूनच आपण आजारी रजेवर असल्याची नोंद नियंत्रण कक्ष लातूर येथे केली. तेंव्हापासून ते लातूर येथेही कामावर आले नाहीत आणि परभणीला तर गेलेच नाहीत. पोलीस निरिक्षक लातूर यांनी 20 ऑगस्ट रोजी त्यांना लातूर जिल्ह्यातून कार्यमुक्त सुध्दा केले होते.

या दरम्यान आजारी असल्याचे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र आजतागायत कार्यालयात दिले नाहीत. तसेच आपल्या आजारी पणाची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुध्दा दिली नाही. प्रदीर्घकाळ कर्तव्यावर गैरहजर राहणे ही अत्यंत गंभीर स्वरुपाची गैरवर्तनाची प्रक्रिया आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास आपण कारणीभुत आहात म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951 च्या कलम 25 अन्वये मला प्राप्त अधिकारांचा वापर करून आपणास शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे असे या आदेशात लिहिले आहे. निलंबन काळात आपल्याला मुळवेतनाच्या अर्धा उदरनिर्वाह भत्ता मिळेल असे या आदेशात लिहिले आहे. निलंबन काळात सुनिल नागरगोजे यांचे लातूर नियंत्रण कक्ष राहिल. तसेच दर महिन्याला मी कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केलेला नाही असे प्रमाणपत्र दिल्यावरच अर्धा उदरनिर्वाह मिळेल असे या आदेशा लिहिले आहे.

हे आदेश पोलीस निरिक्षक सुनिल नागरगोजे यांच्यावर तामिल करण्यासाठी लातूरचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. निखील पिंगळे यांनी हे आदेश सुनिल नागरगोजेवर तामील करण्याची जबाबदारी लातूर येथील मुख्यालयाच्या पोलीस उपअधिक्षकांवर दिली आहे. यापुर्वी सुध्दा अनेकदा सुनिल नागरगोजे यांनी असाच प्रदीर्घकाळ आजारी रजेच्या नावावर सुट्टीत काढला आहे. जवळपास 11 महिने झाले आहेत आणि सुनिल नागरगोजे आपल्या नोकरीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. याच आदेशात सुनिल नागरगोजे यांची विभागीय चौकशी सुध्दा प्रस्तावित करण्यात आल्याचे लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *