नांदेड,(प्रतिनिधी)- आज श्री गणेश विसर्जनाची धामधूम असतांना एक २० वर्षीय युवती आपले जीवन सुद्धा गोदावरीत विसर्जित करण्यास आली होती.पण ड्युटीवरील चाणाक्ष पोलिसांनी तिचा हेतू ओळखला आणि तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.या परिस्थितीत शाब्बास पोलिसांनो शाब्बास म्हणावेच लागेल.
आज अनंत चतुर्दशी,आज सर्वत्र श्री गणेशाला निरोप देण्याची धामधूम सुरु आहे.त्यासाठी जागोजागी पोलीस तैनात आहेत.आज वजिराबाद भागातील गोवर्धन घाट पुलाच्या खाली नदी काठावर पोलीस उप निरीक्षक बाबुराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नोकरी होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास वजिराबाद पोलीस ठाण्यात पुलावरून एक २० वर्षीय युवती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असल्याची खबर आली.तेव्हा ड्युटी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे,पोलीस अंमलदार बबन बेडदे,दिगंबर रेडे आदी अत्यंत विद्युत गतीने गोवर्धनघाट पुलावर पोहचले.तेथे एक २० वर्षीय मुस्लिम समाजाची युवती पोलिसांना सापडली.ती वजिराबाद पोलिसांच्या हद्दीतच राहणारी होती.पोलीस पथकाने आपल्या कसबाला उगाळून त्यातून समन्वयाचा रस काढला आणि त्या युवतीचे आत्महत्या करण्यापासुन मन परिवर्तन केले.
सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे ,पोलीस उप निरिक्षक चव्हाण,पोलीस अंमलदार गणपती केंद्रे,अर्चना गोडबोले,बबन बेडदे,दिगंबर रेडे यांनी केलेल्या मेहनतीला यशाचे फळ येणे अपेक्षितच होते.पोलिसांनी युवतीच्या वडिलांना बोलावले आणि ती युवती त्यांच्या स्वाधीन केली.युवतीच्या वडिलांनी पोलिसांचे आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे धन्यवाद व्यक्त करतांना त्यांना गहिवरून आले होते.
पोलिसांच्या बाबत लिखाण करतांना वास्तव न्यूज लाईव्हच्यावतीने अलंकारिक भाषेचा उपयोग पाहून काही नतदृष्टची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.काहींनी भाडोत्री लेखकांच्या माध्यमातून स्वतः खूप शाहणे असल्याचा देखावा तयार केला होता.ते सर्व फक्त शहाणेच नाहीत तर दिड शहाणे असल्याचे आम्हाला पण माहीतच आहे.अलंकारिक भाषेतील आनंद ज्यांना कळतच नाही त्यांना बोलून आपले वजन कमी करण्याची वास्तव न्यूजची मुळीच इच्छा नाही.
आपल्या जीवनात पोलीस कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असतांना त्या पेक्षा पलीकडे जाऊन धावत पळत एका २० वर्षीय युवतीला भेटून त्यांचे समन्वय घडवून पुन्हा त्यांच्या घरी पाठवले म्हणजे आपल्याला जे शब्द ऐकूच आले नाहीत त्या शब्दांमागील अर्थ समजून घेण्याचा हा पोलिसांचा प्रकार नक्कीच प्रशंसनीय आहेच,तेव्हा शाब्बास पोलिसांनो शाब्बास जर आम्ही लिहिले नाही तर आम्ही आमच्याच लेखणी सोबत बेईमानी केल्यासारखे होईल. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा युवतीचे प्राण वाचवणाऱ्या पोलिसांचे कौतुक जरूर करावे अशी अपेक्षा पण वास्तव आणि फक्त वास्तव छापणाऱ्या वास्तव न्यूज लाईव्हला आहे.