संघर्षातून विजयाचा आलेख तयार करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांना जन्मदिनाच्या शुभकामना…

डोंगरावर लावलेला दिवा प्रकाश कमी देतो. पण तो कितीही दुरून आम्हाला त्या ठिकाणी उजेड आहे याची जाणीव करून देतो. त्या उजेडाच्या आधारावर आम्ही त्या डोंगराला सुध्दा पार करू शकतो. अशाच शिक्षणाच्या उजेडातून आपल्या मेहनतीच्या बळावर विविध पाच स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय नरहरी काळे यांना वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने जन्मदिनाच्या हार्दिक शुभकामना…

मौजे गुंज ता.पालम जि.परभणी येथे नरहरी आणि इंदुबाई यांच्या कुटूंबात दुसऱ्या आपत्याने 2 जानेवारी 1989 रोजी जन्म घेतला. नरहरी काळे यांनी त्याचे नाव दत्तात्रय असे ठेवले. यापुर्वी त्यांच्या घरात नामदेव नावाचा एक कुटूंबिय आला ते दत्तात्रय काळे यांचे मोठे बंधू आहेत. गुंजमध्ये शेती करत नरहरी काळे आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण म्हणतात ना जन्म, मृत्यू हे लिहिलेला आहे. त्याप्रमाणे दत्तात्रय काळे यांच्या मातोश्री इंदुबाई यांचे निधन दत्तात्रय यांचे वय 6 वर्षाचे असतांना झाले. आईचा मृत्यू झाल्यानंतर दत्तात्रय आणि नामदेव यांचे मामा भारत रामजी गवारे यांनी दोन्ही भावांना आपल्या गावी चौंडीअंबा ता.वसमत जि.हिंगोली येथे आणले. काही कारणाने भारत गवारे यांच्या तीन बहिणी आणि त्यांची पाच मुले असे आठ जण शेताच्या आखाड्यावर राहत होते. याच आखाड्यात नामदेव आणि दत्तात्रय यांची पण वर्णी लागली. चौंडीअंबा येथे आल्यानंतर इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्याचे वय होते दत्तात्रय यांचे. मामा भारत गवारे यांनी त्यांना गावापासून 3 किलो मिटर असलेल्या गोरखनाथ विद्यालयात त्यांचा प्रवेश करून दिला. पण मामाच्या घरी राहतांना दोन वर्ष आणखी गेले आणि या दरम्यान गुंजमध्ये असलेली शेत जमीन दत्तात्रय यांचे वडील नरहरी यांनी विकुन टाकली आणि दत्तात्रय यांचे वय आठ वर्ष झाले तेंव्हा दुर्देवाने त्यांच्या वडीलांचे पण निधन झाले. आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या नामदेव आणि दत्तात्रयला सहारा फक्त मामा भारत गवारे यांचा होता.

आखाड्यात राहुन मामाच्या शेतीत काम करणे आणि शिक्षण घेणे अशी दोन कामे करत असतांना अडचण अशी होती की, कोणत्या कामाला महत्व द्यायचे. एका कामाकडे जास्त लक्ष दिले तर दुसऱ्या कामाकडे दुर्लक्ष होईल हा नियम आहे. पण अत्यंत लहान वयात आई-वडील हे छत्र गमावलेल्या नामदेव आणि दत्तात्रयने शेतातील काम आणि शिक्षण या दोन्हीकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यातील दत्तात्रय यांनी पहिली ते दहावी ही इयत्ता शिकतांना गोरखनाथ विद्यालयात नेहमीच प्रथम क्रमांक पटकावला. दत्तात्रयला शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना सुध्दा वाटत होते की, विद्यार्थी असावा तर दत्तात्रयसारखाच. शाळेत बक्षीस घेतांना आई-वडीलांना बोलवले जाते. पण दत्तात्रयकडे तर आई-वडील नव्हतेच त्यांच्याकडे पालक मामा-मामीच होते. दरवेळेस माझा भाचा प्रथम क्रमांक मिळवतो याचा आनंद मामांना होत होता. म्हणून त्यांनी दहावीनंतर 11 आणि 12 शिकण्यासाठी दत्तात्रयला विश्र्वशांती ज्ञानपिठ राहाटी ता.जि.परभणी येथे पाठवले. 12 पर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर दत्तात्रय यांनी अध्यापन पदवीका मिळविण्यासाठी अर्ज भरला आणि त्यांना ते शिक्षण घेण्यासाठी पैसे लागणार होते. तेंव्हा मात्र कुठून तरी विरोध झाला पण मामा भारत गवारे यांनी ते 12 हजार रुपये भरले आणि दत्तात्रय नरहरी काळे यांनी महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरंडेश्र्वर पुणे येथे आपले अद्यापक पदवीकेचे शिक्षण पुर्ण केले. दुर्देवाने त्यांनी पदवीका पुर्ण केली आणि त्याच वर्षीपासून प्राथमिक शिक्षकांच्या भरतीवर बंदी आली.

त्यांच्या सोबत इतर कुटूंबिय मुले जी शिकली होती त्यांनी आपले शिक्षण पुर्ण करून चौंडी अंबा गाव गाठले आणि तेथे शेती करायला लागले. दत्तात्रयच्या मनात एक विचार आला आपण परत गेलो तर आपल्याला मेंढ्या वळाव्या लागतील. आपल्याला गावाकडे परत जातांना काही तरी नोकरी मिळवूनच जायचे आहे म्हणून त्यांनी विविध संस्थांकडून चालविल्या जाणाऱ्या कमवा आणि शिका या योजनेत सहभाग घेतला आणि त्या संस्थेत राहतांना आंबे तोडणे, बागेत पाणी घालणे, शेतातील तण काढणे अशी अनेक कामे केली. संस्थेने त्यांना सायकल दिली होती. पुर्ण पुणे शहर दत्तात्रय काळे यांनी सायकलवर पाहिलेले आहे. जवळपास 25 किलो मिटरचा प्रवास ते सायकलवर करायचे आणि विविध ठिकाणी काम करून मिळणाऱ्या पैशांमधून कमवा आणि शिका या योजनेत त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. पुण्यात गोखलेनगर येथे राहण्याचे ठिकाण होते आणि जवळपास 8 किलो मिटर दुर अध्यापक महाविद्यालय होते. सायकलवर प्रवास करून जातांना येणाऱ्या घामाने संपुर्ण कपडे भिजत होते म्हणून कॉलेजचा युनिफॉर्म थैलीमध्ये घेवून जायचे आणि कॉलेजच्या बाथरुममध्ये ड्रेस बदलून शिक्षण घ्यायचे आणि पुन्हा ते ड्रेस बदलून घरी जायचे असा खडतर शिक्षण प्रवास त्यांनी केला. आपल्या जीवनाच्या रस्त्यांवर चालतांना आलेली सर्व वळणे अत्यंत धैर्यशिल पध्दतीने पेलत दत्तात्रय काळे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरू ठेवला होता. त्यांनी सर्व प्रथम जिल्हा परिषद पुणे येथे लिपीक पदाची परिक्षा दिली आणि त्यात ते उत्तीर्ण झाले. त्यांनी जिल्हा परिषद पुणे येथे नोकरी स्विकारली आणि त्यांचा आनंद गगणात मावला नाही. परंतू लिपीक या पदावर राहण्यापेक्षा त्यापेक्षा मोठे काही तरी मिळावे याचा प्रयत्न त्यांनी सोडला नाही. त्यांनी भारत राखीव बटालीयन, सीजीएफ, एसआरपीएफ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरिक्षक पदाची परिक्षा दिली. त्यात एसआरपीएफची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला आणि त्यांनी लिपीक पद सोडून एसआरपीएफमध्ये नोकरी स्विकारली.

नोकरी सुरु असतांना मामा भारत गवारेंना वाटले की, आपल्याकडील द्वितीय क्रमांकाची मुलगी जयश्री हिचे लग्न दत्तात्रय सोबत करून द्यावे. त्यांचा साखरपुडा करून देण्यात आला. दत्तात्रय काळे यांनी घेतलेल्या मेहनतीला आणखी एक फळ आले.सीजीएफ, आरआयबी आणि पोलीस उपनिरिक्षक या तिनही ठिकाणचे परिक्षा निकाल एकदाच आले आणि त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस उपनिरिक्षक पदाची निवड केली आणि ते सन 2015 मध्ये पोलीस उपनिरिक्षक प्रशिक्षणासाठी पोलीस अकादमी नाशिक येथे आले. त्यांची पहिली प्रशिक्षणार्थी नेमणूक सन 2016 मध्ये नांदेड जिल्ह्यात झाली. नांदेड जिल्ह्यात पहिली नियुक्ती पोलीस ठाणे भाग्यनगर येथे केली. दुसरी नियुक्ती शिवाजीनगरच्या सत्र खटल्यांचे तपास करण्यासाठी झाली आणि ती सुध्दा त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. तिसरी नियुक्ती पोलीस ठाणे इतवारा येथील गुन्हे शोध पथकात झाली. त्याचा फायदा मिळाला आणि स्थानिक गुन्हे शाखा नांदेडमध्ये मिळाली.दरम्यान जयश्री यांच्यासोबत लग्न झाले. जयश्री आणि दत्तात्रय यांच्या बागेत इशान आणि प्रिशा अशी दोन फुले उमलली आणि खडतर प्रवास करून दत्तात्रय काळे आज एक आनंदी जीवन जगत आहेत.

पोलीस उपनिरिक्षक पदाची नियुक्ती मिळाल्यानंतर चौंडीअंबा गावात दत्तात्रय काळे यांचे बॅनर लावण्यात आले गोरखनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दत्तात्रय काळे यांच्याकडून ही स्फुर्ती घेतली की, पैसे खर्च न करता गरीबाचा मुलगा सुध्दा नोकरीला लागू शकतो. त्यानंतर चौंडीअंबा गावातील बरेच युवक विक्री कर विभागात नोकरीला लागले. काही भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. नोकरी लागलेल्या या सर्व चौंडीअंबा युवकांनी गावात शिक्षणासाठी कोणाला पुस्तकांची कमी पडू नये म्हणून वाचनालय सुरू केले आहे. सोबतच शिक्षणासाठी कोणाला पैशांची गरज असेल तरी दत्तात्रय काळेसह चौंडीअंबा गावातील नोकरीला असलेले इतर सर्व युवक आपल्या मदतीचा हात नेहमीच मोकळा ठेवतात. इतरांचे शेत शिवार भिजवतांना आपले वाफे सुध्दा कोरडे न ठेवता त्यात सुध्दा आनंदाचे पिक तयार करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय नरहरी काळे यांना वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने त्यांच्या जन्मदिनी या शब्द शुभकामना…

पोलीस दलात काम करतांना प्रवाहसोबत चालावे लागते आपल्या मर्यादेत असलेल्या कामापर्यंत आपण प्रत्येकाला न्याय देवू शकतो. परंतू वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानंतर न कळत अन्याय सुध्दा करावा लागतो असे दत्तात्रय काळे यांचे मत आहे. परंतू माझ्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला ही नोकरी कायम ठेवण्यासाठी दिलेली जबाबदारी मी पुर्ण मनलावून पुर्ण करतो असे दत्तात्रय काळे सांगतात. जीवनात संघर्ष करत असतांना संघर्षातून मिळणारी आनंदाची वाट मला मिळाली आहे आणि त्या वाटेतून मी भविष्याच्या माझ्या नोकरी कालखंडात सर्व सामान्य माणसाला कसा न्याय देता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहिल असे ते सांगतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *