कुंडलवाडीत शुल्लक कारणावरून झालेली मारहाण खूनात बदलली

नांदेड(प्रतिनिधी)-कुंडलवाडी गावात ५ डिसेंबर रोजी एका ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण झाली होती. आज सकाळी उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ५ डिसेंबर रोजी मयत व्यक्तीला मारहाण करणार्‍या व्यक्तीविरुध्द आता खूनाचा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दि.५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्यासुमारास कुंडलवाडी गावातील पोचम्मा गल्लीत असलेल्या इरेश टेलर या दुकानासमोर नरसीमल्लू गंगाराम अटनलवार (५२) हे बसले होते.  तेंव्हा दुकान मालक पिराजी उर्फ इरेश बालन्ना मोदकेवार (३४) व्यवसाय टेलरींग याने नरसीमलूला  माझ्या दुकानासमोरून उठून जा असे सांगितले आणि त्यातून वाद झाला. त्यावेळी पिराजी उर्फ इरेशने लाकडाच्या सहाय्याने नरसीमल्लू यांना मारहाण केली. त्यातील एक फटका मानेच्यावर, डोक्याच्या पाठीमागील शेवटच्या भागात अर्थात लहान मेंदुवर बसला. त्यानंतर नरसीमलुला  उपचारासाठी नांदेड येथे आणण्यात आले होते. एक आठवड्यानंतर आज १२ डिसेंबर रोजी सकाळी नरसीमलू अटनलवार यांचा मृत्यू झाला.
नरसीमलू यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक करिम खान पठाण, पोलीस उपनिरिक्षक विशाल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार इदरिस बेग, तैनात बेग, चॅपलवार, महेश माकुलवार यांनी त्वरीत प्रभावाने पिराजी उर्फ इरेश बालन्ना मोदकेवार (३४) यास ताब्यात घेतले. त्यानंतर नरसीमलुचे पुत्र गंगाराम नरसीमल्लू अटनलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पिराजी उर्फ इरेश मोटकेवार विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *