नांदेड (जिमाका) – खरीप हंगाम सन 2023-24 पासून शेतकऱ्यासाठी प्रति अर्ज केवळ 1 रु. भरुन पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पिक विमा पोर्टलवर नोंदणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर.डी. कळसाईत यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी आधार कार्ड, पिक पेरा अहवाल, मोबाईल क्रमांक, सातबारा, 8 अ, बॅक पासबुक इ. बाबीची आवश्यकता लागणार आहे.
या योजनेत पुढील बाबीचा समावेश करण्यात आला आहे. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात 14 दिवसांपर्यत नुकसान या बाबींचा समावेश आहे.
या योजनेतील समाविष्ट पिके याप्रमाणे आहेत. पिक वर्गवारी तृणधान्य व कडधान्य पिके यात खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मुग, उडीद, तुर, मका या आठ पिकांचा व रब्बी हंगामातील गहु (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) हरभरा, उन्हाळी भात या 4 रब्बी हंगामातील पिकाचा समावेश आहे. गळीतधान्य पिकामध्ये खरीप हंगामातील भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन या 5 पिकांचा तर रब्बी हंगामातील उन्हाळी भुईमुग या पिकाचा समावेश आहे. नगदी पिकामध्ये खरीप हंगामातील कापुस, खरीप कांदा या दोन तर रब्बी कांदा या रब्बी हंगामातील पिकाचा समावेश आहे.
सध्याच्या अपुऱ्या पाऊसामुळे सोयाबीन, कापूस यासारख्या मुख्य पिकांची महसूल मंडळात विहित मानकापेक्षा कमी पेरणी झाल्यास शेतकऱ्यांना विनापेरणी साठी विमा संरक्षण लाभणार आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. शेवटच्या तारीखेला विमा भरण्यासाठी संकेतस्थळावर ताण येवून संकेतस्थळ चालत नाही. अशा कारणामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी त्वरीत विमा भरण्याची कार्यवाही करावी, असे उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.