नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाने मे महिन्यात गंगाखेड येथे खून करून फरार झालेल्या एका युवकाला त्याच्या साथीदारासह श्रावस्तीनगर भागातून पकडले. त्यांच्याकडून 1 पिस्तुल आणि दोन काडतूस सापडले आहेत. त्यांची दुचाकी सुध्दा पोलीसांनी पकडली आहे.
नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 6.30 वाजता गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी श्रावस्तीनगर भागात राहुल उर्फ बकासुर नित्यानंद भगत (20) वर्ष रा.गोविंदनगर नांदेड आणि सतिश गंगाधर घोरपडे (25) रा.चौधरीगल्ली पालम जि.परभणी यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि त्यातील मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतूस सापडले. त्यांच्याकडे एक दुचाकी सुध्दा होती. ती पोलीसांनी जप्त केली. या पिस्तुल बाळगणाऱ्या युवकांची अधिक माहिती घेतली असता त्यांनी मे 2022 रोजी गंगाखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका व्यक्तीचा खून केला होता. त्यासंदर्भाने गंगाखेड येथे गुन्हा क्रमांक 234/2022 भारतीय दंड संहितेचे कलम 302, 364, 120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख आदींनी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख इब्राहिम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अजहर, दत्ता वडजे, विष्णु दबडे यांचे कौतुक केले आहे.
