नांदेड(प्रतिनिधी)-राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत एका पत्रकार महिलेचा मोबाईल चोरीला गेला आहे. बाऱ्हाळी येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा फोडली आहे. जलधारा फाटा येथे दुकान फोडणारे तीन चोरटे आपली दुचाकी सोडून पळून गेले आहेत. मौजे बळेगाव ता. नायगाव येथे टायर चोरले आहेत. भोकर येथून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
मुंबई येथून आरती विठ्ठल घारगी या पत्रकार नांदेडला भारत जोडो यात्रेचे वृत्तांकन करण्यासाठी आल्या होत्या.10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता राहुल गांधी देगलूर नाका येथे पोहचले आणि त्या गर्दीचा फायदा उचलून चोरट्यांनी आरती घारगी यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार अनिल मानेकर अधिक तपास करीत आहेत.
बाऱ्हाळी ता.मुखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे कुलूप 15 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान तोडण्यात आले. त्यातून शालेय पोषण आहार 39 हजार 166 रुपये किंमतीचा चोरून नेण्यात आला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सिध्देश्र्वर अधिक तपास करीत आहेत.
गोबनसिंग नंदलालसिंग चौफाडे हे जलधारा फाटा येथे आपली कृषी सेवा केंद्र दुकान बंद करून 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजता घरी गेले. अर्ध्या तासातच त्यांच्या दुकानाचे शटर वाकवून त्यांच्या गल्यातील 8 हजार रुपये रोख रक्कम व काही नाणी असा ऐवज चोरून तिन जण मोटारसायकल क्रमांक एम.एच.29 बी.एक्स. 5877 वर बसून पळून जात असतांना लोकांनी त्यांना अडवले. त्यावेळी दुचाकी सोडून तिन्ही चोर पळून गेले. ईस्लापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ए.ए.शेख अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथून एम.एच.26 बी.ए.8232 क्रमांकाची 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 2 -3 नोव्हेंबरच्या रात्री चोरीला गेली आहे. बालाजी मोतीराम राजुटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
आनंदा सोपानराव बेलकर यांनी बळेगाव ता. नायगाव येथे आपल्या घरासमोर ट्रॅक्टर उभे केलेले होते. 7-8 नोव्हेंबरच्या रात्री त्या उभ्या ट्रक्टरचे दोन टायर 40 हजार 400 रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी काढून नेले आहेत. कुंटूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कुमरे अधिक तपास करीत आहेत.
भारत जोडो यात्रेत महिला पत्रकाराचा मोबाईल चोरला; इतर अनेक चोऱ्या