नांदेड(प्रतिनिधी)-दोन गट नंबरामध्ये जमीन बळकावण्याच्या उद्देशाने नांदेड न्यायालयाजवळ खोटी स्वाक्षरी करून एका वयोवृध्द महिलेची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 8 जणांविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका महिला वकील आणि एक मुद्रांक विक्रेत्याचे नाव पण आहे. ही जमीन मौजे गोजेगाव ता.मुखेड येथे आहे.
62 वर्षीय महिला कमलाबाई नारायण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे गौजेगाव ता.मुखेड येथे गट क्रमांक 372 मध्ये त्यांची एक हेक्टर 59 आर जमीन आहे. तसेच गट क्रमांक 374 मध्ये एक हेक्टर 10 आर जमीन आहे. या दोन जमीनी बळकावण्यासाठी त्यांचा नवरा आणि त्यांची खोटी स्वाक्षरी करून कागदपत्र बनवले. हे कागदपत्र तहसील कार्यालय मुखेड आणि मुखेड न्यायालय येथे खरे आहेत असे दाखवून त्याचा वापर केला.
हा सर्व घोटाळा करणाऱ्यांमध्ये महिला वकील ऍड. सावीत्री जोशी, चंद्रमणी सावंत, अनिल ताणाजी पाटील, अजित संभाजी पाटील, आनंद लक्ष्मण जाधव , सुरेश रामराव मंदिलवार, अशोक दिगंबर भोसले, भिमअप्पा मलिकार्जुन ठेंगटे या आठ जणांचा समावेश आहे. या सर्व घटनाक्रमाची अगोदर चौकशी झाली. कारण घटनाक्रम 2 मार्च 2010 या कालखंडाचा आहे. आता या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 467/2021 कलम 420, 467, 468, 471 आणि 34 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.