वडार समाजाला आदीवासी दर्जा मिळविण्यासाठी वडार आरक्षण संघर्ष यात्रा-भरत विटकर

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या आरक्षण विषय तापलेला आहे. यातच वडार समाजाला आदीवासी दर्जा मिळविण्यासाठी वडार आरक्षण संघर्ष यात्रा काढली असून नागपूरच्या वर्धारोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नागपूर विधानभवनापर्यंत पायी मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन वडार समाजाचे नेते भरत विटकर यांनी सांगितले.
इंग्रजांच्या काळात क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लागू होता. तो कायदा 1871 ते 1952 पर्यंत अस्तित्वात होता. या कायद्याच्या अनुरूप वडार समाजाची नोंद चोरी करणारी जमात या सदरात होती. कारण वडार समाज गावोगावी फिरून दगड फोडण्याचे काम करत होता आणि त्यातून शंकेच्या अनुरूप हा भाग तयार झाला. यामध्ये एकूण 14 जमांतींचा समावेश होता. पुढे 19 नोव्हेंबर 1961 रोजी वडार समाजाला विमुक्त जमाती प्रवर्गात सामील करण्यात आले. 1992 मध्ये राजकीय आरक्षण तयार करतांना वडार समाजाची गणती ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणात झाली. छत्रपती शाहु महाराजांनी आरक्षण उदाहरण देतांना असे सांगितले होते की, चार घोड्यांपैकी तीन घोडे मजबुत असतील आणि एक कमजोर असेल तर कमजोराकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्या आधारे आम्हाला विमुक्त जमाती प्रवर्गात सुरूवातीला असणारे 4 टक्के आरक्षण नंतर ओबीसीच्या 27 टक्केमध्ये जोडले गेले. परंतू 1992 मध्ये विमुक्त जमातीतून ओबीसी प्रवर्गात आल्यानंतर 1994 मध्ये नवीन शासन निर्णय झाला. ज्यामध्ये आमचे 4 टक्के आरक्षण 3 टक्के झाले आणि आरक्षणातील अंतर्गत आरक्षण खुले ठेवून त्यामध्ये वडार समाजावर अन्याय झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मुळचे कोण हे पुस्त 1948 मध्ये लिहिले आहे. त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आमचा उल्लेख केलेला आहे. पण खुले आरक्षण करून शिक्षण आणि नोकरीमध्ये आम्हाला पुन्हा मागे पाडण्यात आले. आमच्या जातीत असलेल्या भामटा या शब्दाला जोडून राजपूतांनी आमचे आरक्षण पळवले.आमच्या समाजामध्ये शिक्षण कमी होते. त्यामुळे ही झालेली फसवणूक आम्हाला कळलीच नाही. सध्या आरक्षण हा विषय जोरदारपणे राज्यात तापत आहे. त्यानुसार आम्ही सुध्दा आता वडार आरक्षण संघर्ष यात्राच्या माध्यमातून आमच्या मागण्या सरकारसमोर मांडणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली. 77 वर्षात एकही आमदार वडार समाजाचा झाला नाही. हे सर्व अंतर्गत खुले आरक्षण यामुळे घडले. म्हणून आता अंतर्गत खुले आरक्षण बंद व्हावे.आमच्या नावावर इतरांनी घेतलेला फायदा बंद करावा. आम्ही स्थलांतरीत आदीवासी आहोत. आमचा स्वतंत्र प्रवर्ग आहे. कर्नाटकात तर वडार समाजाची नोंद अनुसूचित जातीमध्ये आहे या सर्व बाबींचा विचार करून आम्ही ही आरक्षण संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे भरत विटकर म्हणाले.याप्रसंगी त्यांच्यासोबत मारोती गोरटकर, प्रा.साहेबराव गोरे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *