राजकारणात तु-तु-मै-मै व्हावीच पण ती जनतेच्या भल्यासाठी व्हावी-श्री.श्री.रविशंकरजी

नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात व्यक्तीगत स्वरुपाची टिका-टिपणी होणे ही नागरीक या दृष्टीकोणातून अत्यंत दुर्देवी बाब आहे. राजकारणात तु-तु, मै-मै व्हावी पण ती तु-तु मै-मै नागरीकांच्या विकासासाठी हवी, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हींगचे गुरूदेव श्री.श्री.रविशंकरजी यांनी केले.
आर्ट ऑफ लिव्हींगच्यावतीने नांदेडमध्ये गुरूदेव श्री.श्री. रविशंकरजीसोबत महा सत्संग गुरुवाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे स्थळ मामा चौक येथे होते. गुरुजींच्या आगमनानंतर त्यांनी सर्व प्रथम सचखंड श्री हजुर साहिब येथे जाऊन आशिर्वाद प्राप्त केले. सायंकाळी जवळपास 1 ते दीड लाख एवढ्या मोठ्या भक्तांसोबत सत्संग झाला. सुरूवातीला. जय.. जय…गोविंद.. हरे जय..जय.. गोपाल हरे , भोले नाथ शिवशंभो भजे ,आप मुकदमो है सारे लाल गुलाल रंगारे ,भवा भयंकर गिरीजा शंकर धिमीधिमी तक नर्तनझेला या भजनांसोबत गुरुजींनी भक्तांच्या मध्यभागी चालत व्यासपीठापर्यंत गेले . दरम्यान भक्तांवर त्यांनी फुले उधळी, भक्तांनी दिलेले हार स्विकारले आणि व्यासपीठावर स्थानापन्न झाले.


या सत्संगाचे स्वागताध्यक्ष अशोक चव्हाण, गुरूद्वारा श्री लंगर साहिबजींच्यावतीने संतबाबा श्री.बलविंदरसिंघजी,सचखंड श्री हजुर साहिब यांच्यावतीने संत बाबा श्री रामसिंघजी,श्री मातासाहेब गुरूद्वारा यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री.श्री.रविशंकरजी यांना फेटा बांधून सन्मान करण्यात आला. त्यावेळी नानक नाम जहाज है हे भजन गायीले गेले. आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला.
कसे आहात, झकास काय अशा मराठी शब्दातून श्री.श्री. रविशंकरजी यांनी आपल्या बोलण्याची सुरूवात केली. आपण आज सर्वजण येथे चिंता घेवून आला आहात पण मी ती चिंता तुम्हाला परत घेवून जाऊ देणार नाही असे गुरुजी म्हणाले. चिंतेला येथेच सोडा आणि चिंतन घेवून जा, ते चिंतन म्हणजे स्वत:चे आत्मचिंतन करा म्हणजे सर्वकाही ठिक होईल. एकदा आपल्या वयाला आठवा तर आपल्या लक्षात येईल की, अर्धे जीवन आपण झोपण्यात घालवले, उर्वरीत जीवन आपल्या जेवणात घालवले, महानगरांमध्ये दहा वर्ष वाहतुकीत अडकून जातात. आम्ही जगलो आहोत काय? हा विचार केला तेंव्हा तुमच्या लक्षात येईल की, आपल्याला जगण्याची गरज आहे. जीवनाच्या विचार अत्यंत विशाल दृष्टीकोणातून करत जा. रडत-रडत जगायचे आहे, नकारात्मक भावनेतुन जगायचे आहे किंवा हिंमतीने, आनंदाने आणि उत्साहात जगायचे आहे याचा निर्णय आपला आपणच घ्यायचा आहे. जीवनात त्रास सर्वांनाच येतात. कोणाला आला नाही असा प्रश्न गुरूजींनी विचारला. त्या समस्या पार करतांना एक अदृष्य शक्ती तुमच्या पाठीशी राहते ती अदृष्य शक्ती म्हणजे तुमचा विश्र्वास. त्या ईश्र्वरावरचा जो हे जग चालवतो. जीवनाच्या रस्त्यात चालतांना कधी-कधी विश्र्वास ढगमगतो त्यासाठी तुम्ही ध्यान करा तो विश्र्वास तुम्हाला समस्येसोबत झगडण्याची ताकत देईल.


जगात एक-दुसऱ्याला शिव्या देण्याच्या प्रथेवर गुरुजींनी संस्कृतमधील एक सुभाषीत सांगून शिवी या शब्दाचा संस्कृतमधील अर्थ संपत्ती असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणी-कोणाला शिवी देत असेल तर त्याला देवू द्या तुम्ही संपन्न होणार आहात. त्याच्या शिव्यांमुळे तुम्हाला जर राग आला तर तुम्ही कोण्या इतरांच्या चुकांसाठी स्वस्तला त्रास देत आहात आणि असा त्रास झाला की, मन कमकुवत होते आणि जगणे कठीण होते. त्यामुळे इतरांच्या चुकीला रागाच्या स्वरुपाचा त्रास स्वत: घेवू नका.
भौतिक आणि अध्यात्मीक जीवन याची सांगड कशी घालायची या विषयांवर बोलतांना गुरुजी श्री.श्री.रविशंकरजी म्हणाले मन आणि शरीर एकत्र चालतात. भौतिक जीवनातून आपल्या शारिरीक आणि आवश्यक गरजा पुर्ण होतात आणि अध्यात्मीक जीवनातून आपली मानसीक ताकत वाढते. अशाच प्रकारे भौतिक-अध्यात्मीक हे सर्व जीवन एकत्र आहे.
सत्संगाचे स्वागताध्यक्ष आ. अशोक चव्हाण यांनी आजच्या राजकीय जीवनात मतभेदांची मर्यादा संपली आहे ती मर्यादा ओलांडून आता एकमेकांवर व्यक्तीगत टिका-टिपणी होता. त्या टिका-टिपणींचा देशातील राजकीय परिस्थितींवर प्रभाव पडतो याबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर उत्तर देतंाना गुरुजी श्री.श्री. रविशंकरजी म्हणाले की, मतभेद असणे आवश्यक आहे, राजकारणात तु-तु मै-मै, वाद-विवाद झालेच पाहिजे त्यातून समाजाचे भले होणे अपेक्षीत आहे. कारण सत्ताधारी पक्षांची ताकत विरोधी पार्टी आहे आणि विरोधी पार्टीची ताकत सत्ताधारी पार्टी आहे. वाद-विवादातून जनतेचे काय भले करता येईल याचा विचार करा, व्यक्तीगत टिका-टिपणी होत असेल तर नागरीक या दृष्टीकोणातून हा प्रकार अत्यंत अशोभनिय आहे. सन्मान हा सर्वांनाच हवा असतो. तो सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पार्टी असेल. याबाबतचे उदाहरण सांगतांना गुरुजींनी महाभारतात झालेले युध्द सुर्योदय ते सुर्यास्त चालायचे. सुर्यास्तानंतर त्या एकमेकांविरुध्द भांडणाऱ्या योध्द्यांनी एक दुसऱ्यांची हाल-हवाल विचारली होती असे सांगितले.
याप्रसंगी उपस्थित असलेले मुखेड येथील विरुपाक्ष मठातील संतांनी गुरुजींना सांगितले की, धर्मात राजकारण आणि राजकारणात धर्म याबद्दल मार्गदर्शन करा. यावर श्री.श्री.रविशंकरजी म्हणाले धर्मात राजकारणाची गरज नाही. पण प्रत्येक राजकीय व्यक्ती हा धार्मिक असला पाहिजे. राजनेता धार्मिक नसेल तर तो अधर्मिक होईल आणि ही बाब समाजासाठी घातक आहे. जेथे जनता असते तेथे राजकारण येणारच आपण नको रे बाबा हे राजकारण आहे असा विचार करून त्या घटनेतून वेगळे होतो. परंतू त्यात आपण सहभागी झाले पाहिजे कारण राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची विचार श्रेणी ही वेगळी असते. त्या विचारश्रेणीला समजून घेतले पाहिजे आणि ही समजून घेण्याची सवय आपण दुर्लक्षीत केली तर आपण स्वत: भोवतिच एक भिंत तयार करून संकुचित भावनेत जाणार आहोत. जय..जय.. शिवशंभोच्या नादात या सत्संगाचा समारोप झाला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या सत्संगात कोणतीही बाधा येणार नाही यासाठी भरपूर मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *