नांदेड(प्रतिनिधी)-भर दुपारी एका व्यक्तीला काठीने मारहाण करून आणि खंजीरचा धाक दाखवून दोन महिला आणि एका युवकाने 27 हजार 70 रुपयांची लुट केली होती. शिवाजीनगर पोलीसांनी चार तासात हा गुन्हा उघडकीस आणला.
दि.5 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता एक व्यक्ती आपल्या दुचाकी गाडीवरून अंकुर हॉस्पीटल दत्तनगर समोरून जात असतांना एका व्यक्तीने त्यांना थांबवले आणि मोबाईल कॉल करू द्या असे सांगितले.त्यावेळी त्याच्यासोबत दोन महिला होत्या. नंतर त्या दोन महिला आणि त्या युवकाने मिळून दुचाकीवरील व्यक्तीचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि खिशातील 15 हजार 70 रुपये असा एकूण 27 हजार 70 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा क्रमांक 212/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार दाखल झाला.
शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार दिलीप राठोड, शेख इब्राहिम, देवसिंग सिंगल, शेख अहजर, दत्ता वडजे, विष्णु डफडे आदींनी चार तासांच्या आत या दरोडेखोरांना शोधले. सचिन भारत खिल्लारे (22) रा.यशोसाई हॉस्पीटलच्या पाठीमागे जुना कौठा नांदेड, माया राजू माथेकर(35) रा.मालेगाव ता.अर्धापूर ह.मु. दत्तनगर रेल्वे पटरी जवळ, सोनी सुनिल नरवाडे (32) रा.चैतन्यनगरच्या पाठीमागे यांना पकडले. यांच्याकडून 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि धाक दाखविण्यासाठी वापरलेला खंजीर वापरण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी शिवाजीनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.